अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथे कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून तालुका प्रशासनाने जाहीर केले.
अशा परिस्थितीत गावात आरोग्य विभाग व ग्रामपंचायत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत सुरू केलेल्या लेटरवाॅरमुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. लोहसर येथे कोरोनाचे २३ रुग्ण आढळून आले.
रुग्णवाढीचे खापर सत्ताधारी गटाने आरोग्य विभागावर फोडत निष्काळजीपणाबाबत ग्रामपंचायतीने वरिष्ठांना पत्र देऊन त्यांना योग्य ती समज द्यावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पत्राद्वारे दिला.
तर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आरोग्य विभागाला सहकार्य करत नसल्याबाबतच्या तक्रारी स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या कानी घातल्याने ग्रामपंचायत व आरोग्य विभाग यांच्यात सुरू झालेल्या
या आरोपाच्या लेटरवॉरमुळे सर्वसामान्य ग्रामस्थ मात्र हतबल झाले. कोरोनाच्या परिस्थितीत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याऐवजी त्यांना राजकीय सूड बुद्धीतून त्रास देण्याचे काम काही लोक करत आहेत.
लोहसरच्या डॉ. पारगावकर व आरोग्य सेविका गिते यांचे काम चांगले असून त्यांनी वरिष्ठांकडे विनंती करून लोहसर येथे शिबिर घेतले. खऱ्या अर्थाने ॲक्टिव्ह रुग्ण किती हे स्पष्ट झाले.