अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा पायउतार होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णदर घटत असल्याने प्रशासन देखील काही काळ निर्धास्त झाले होते. मात्र या आनंदावर विरजण पडू लागले असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात तयार झाले आहे.
दिवसागणिक आकडेवारी वाढत असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची राहुरी तालुक्यात पायमल्ली होत असून तालुका महसूल प्रशासन व आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने राहुरी तालुक्यात करोनाचा पुन्हा उद्रेक होत आहे. काल शनिवारी (दि.20) दिवसभरात 14 जणांना करोनाची बाधा झाली आहे.
त्यात 7 महिलांचा समावेश आहे. गेल्या पाच दिवसात एकूण 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने नागरिक भयभीत झाले असून तालुक्यातील आरोग्य व महसूल प्रशासनाला याबाबत गांभीर्य नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
राहुरी शहरासह तालुक्यात नियम धाब्यावर बसविले जात असून शासकीय कार्यालये व विविध संस्थांमध्ये, शाळा व महाविद्यालयात नागरिकांसह अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांकडूनच जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची पायमल्ली होत आहे.