पुढील वर्ष कोरोनामुळे अधिक बिकट होऊ शकतं संशोधनातून आली माहिती समोर…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-कोरोनाच्या एका नव्या ‘सुपर व्हेरिएंट’ चा प्रादुर्भाव पुढच्या वर्षी वाढणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. हा व्हेरिएंट सध्याच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक असून ज्यांचे लसीकरण झालेले नाही असे लोक याचे सुपर स्प्रेडर्स बनण्याची शक्यता आहे असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.

सुपर स्प्रेडर्स असे लोक असतात जे कोरोनाचा संसर्ग हा अधिक वेगाने आणि तुलनेने अधिक लोकांमध्ये पसरवतात. म्हणजे एखादा बाधित व्यक्ती जर इतर दोघांमध्ये कोरोनाचा प्रसार करत असेल तर सुपर स्प्रेडर्स हा तुलनेने दहापेक्षाही अधिक लोकांमध्ये त्याचा प्रसार करत असतो. त्यामुळे सामूहिक संसर्गाची भीती निर्माण होण्याची शक्यता असते.

पुढील वर्ष कोरोनामुळे अधिक बिकट होऊ शकतं, असं एक संशोधनातून पुढे आलं आहे. कोविड 22 हा संभाव्य व्हायरस जगात धुमाकूळ घालू शकतो. त्याला रोखायचं असेल, तर लसीकरण आणि संशोधनाचा वेग वाढवावा लागणार आहे.

कोविड 19 व्हायरस एअरबॉर्न होण्यासाठी स्वतःला झपाट्यानं म्युटेट करत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिलाय. स्वित्झर्लंडच्या फेडरल टेक्नोलॉजी इन्स्टिट्यूटनं यावर संशोधन केलंय.

संस्थेमधले इम्युनॉलॉजिस्ट डॉ. साई रेड्डी यांनी कोरोनाचा सुपर व्हेरियंट येण्याची शक्यता वर्तवली आहे. हा व्हेरियंट आला तर केवळ लसींवर विसंबून राहता येणार नसल्याचं ते सांगतायेत.

रोग प्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी हा व्हायरस म्युटेट झालेला असेल. त्याचा सामना करण्यासाठी अधिक शक्तिशाली व्हॅक्सिन तयार करावं लागेल आणि जास्त काळजी घ्यावी लागेल, असंही डॉ रेड्डी यांनी म्हटलंय.

सध्या जगभरात कोविड-19चं लसीकरण सुरू असलं, तरी हा वेग कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. कोविड व्हायरस ज्या वेगानं म्युटेट होतोय त्या वेगानं लसीकरण आणि संशोधन झालं नाही, कोविड-२२ चं थैमान अटळ आहे.

अहमदनगर लाईव्ह 24