अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही पारनेर तालुक्यातील वाळवणे येथील श्री काळ भैरवनाथ यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे.
यंदाही यात्रोत्सव होणार नसल्याने अनेक वर्षांची धार्मिक परंपरा खंडीत होत असल्याने भाविकां नी नाराजी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्वच यात्रोत्सव बंद आहेत .
धार्मिक स्थळे, यात्रोत्सव,आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिलेले आहेत. त्यामुळे परिसरातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री भैरवनाथांचा यात्रोत्सव यंदाही रद्द झालेला आहे.
दरवर्षी यात्रेसाठी महाराष्ट्रातून लाखो नाथभक्त मोठ्या श्रध्देने दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे न चुकता येत असतात. त्यामुळे यात्रा काळात लाखोंची उलाढाल होते, मात्र गत वर्षापासून यात्राच नसल्याने
उलाढाल थांबल्याने लहान – मोठ्या व्यवसायिकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परंपरेनुसार शनिवार दि. २४ रोजी देवाला तेल लावण्याचा कार्यक्रम असून त्या दिवसापासून ५ दिवसांचा उपवास घरच्या घरी करून
आपली परंपरा जतन करावी व बुधवार दि. २८ रोजी यात्रोत्सवाच्या दिवशी भाविकांनी पुजाअर्चा घरीच करून दुपारी १२ वाजता उपवासाची सांगता करावी.
तसेच लॉकडाऊन असल्याने कोणीही मंदिराच्या आवारात दर्शनासाठी येऊ नये अशी विनंती उपसरपंच सचिन पठारे यांनी भाविक व ग्रामस्थांना केली आहे .