अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील श्री सिद्धीविनायकाचा यावर्षीचा माघी गणेशोत्सव सोहळा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी अत्यंत साधेपणाने सुरू आहे.
पालखी सोहळाही रद्द करण्यात आला असून, मंदिर सोमवारी जन्मोत्सव सोहळ्यादरम्यान सकाळी नऊ ते एक वाजेपर्यंत भाविकांसाठी बंद राहणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव अष्टविनायक तीर्थक्षेत्र सिद्धटेक येथे माघ व भाद्रपद महिन्यात गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
सायंकाळी होणाऱ्या पालखी उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या उत्सवाला मोठी परंपरा आहे. यातील चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशजन्म सोहळ्याचा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडतो.
पंचमी दिवशी महाप्रसाद देऊन गणेशोत्सव पार पडतो. मात्र, यावर्षी संकटमोचक गणरायाचा गणेशोत्सव सोहळाच कोरोना निर्बंधात अडकला आहे.
माघ प्रतिपदेपासून सुरू झालेला हा गणेशोत्सव पालखी सोहळ्याविनाच पार पाडण्याचे नियोजन पोलीस प्रशासन व देवस्थानने केले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी भजन, कीर्तन होणार नाही.
जिल्हाधिकारी यांच्या कोरोना नियमावलीचे पालन केले जाणार असल्याची माहिती चिंचवड देवस्थान अंतर्गत सिद्धटेक पोट देवस्थानचे व्यवस्थापक सुधीर पाचलग यांनी दिली.