अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी सातत्याने रुग्णसंख्या घटत जात असल्याने कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली होती. मात्र जिल्ह्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोना हातपाय पसरू लागला आहे.
यामुळे रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ दिसून येऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील संगमनेर, शेवगाव व पारनेर तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त आढळून येत आहे.
यातच शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना सक्रिय होऊ लागला आहे. शेवगाव तालुक्यातील दहिगावने, शहरटाकळी, रांजणी आदी भागात कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने नागरिकांत समाधानाचे वातावरण होते.
रुग्णसंख्या घटताच नागरिकांत बेफिकिरपणा वाढला. त्यामुळे परिसरात कोरोना बाधित रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाली असून दोन दिवसांत प्राथमिक आरोग्य केंद्र दहिगावने येथे तपासणी केलेल्यांपैकी ३७ नागरिक कोरोना बाधित आढळल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी दिली.
सोमवारी व मंगळवारी दहिगावने ५, रांजणी ९, शहरटाकळी २०, भावीनिमगाव २ आणि खामगाव १ असे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
गावातील दवाखाने, मेडिकल, दूध संकलन अशा अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन दहिगावने प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास कानडे यांनी केले आहे.