अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- नगर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १०६ पैकी २२ गावांनी स्वयंस्फूर्तीने जनता कफ्र्यु पुकारून गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत.
नगर तालुक्यात आजतागायत सुमारे १३ हजार रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. ग्रामीण भागात कोरानाचे थैमान सुरू असून तालुक्यात २०० जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे गावोगावी जनता कफ्र्यू पुकारण्यात येत आहे.
तालुक्यातील जेऊर, पिंपळगाव माळवी, बहिरवाडी, इमामपुर, खडकी, निंबळक, नवनागापूर, चास, कामरगाव, वाकोडी, दशमी गव्हाण, चिचोंडी पाटील, वडगाव गुप्ता, वाळकी, साकत, निमगाव वाघा, नागरदेवळे, हिंगणगाव, हमीदपूर,
टाकळी काझी, दरेवाडी, नांदगाव या गावांनी स्वयंस्फूर्तीने जनता कफ्र्यू पुकारुन गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नगर तालुक्यातील १०६ गावांपैकी २२ गावांनी जनता कफ्र्यू पुकारुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुक्यात आजमितीला जवळपास १६०० रूग्ण सक्रिय आहेत.तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोनाने शिरकाव केलेला दिसून येत आहे. गावोगावी कोरोना ग्रामस्तरीय समितीने पुढाकार घेत, जनता कफ्र्यू पुकारण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील पत्रकारांनी जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश गुंड यांनी सर्व पत्रकार सदस्यांना आपल्या गावात जनता कफ्र्यू पुकारण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार तालुका पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी आपआपल्या गावात जनता कफ्र्यू पुकारण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवत गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यास कोरोना समितीला मदत केली.
प्रशासनाच्या वतीने कोरोनाला आळा घालण्यासाठी अथक प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते तर ग्रामीण भागात नागरीकांचा हलगर्जीपणा चांगलाच भोवला असल्याने कोरोना रुग्ण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत.