अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान होत आहे. ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांची अवस्था तर खूपच बिकट आहे.
कोरोना हे जागतिक पातळीवरील संकट असून, हे मानवतेवर आलेलं संकट आहे. त्यामुळे या संकटाला सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. असे मत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. ना. थोरात संगमनेर येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
कोरोनाची साखळी तोडून कोरोनाबळींची संख्या शून्यावर येत नाही तोपर्यंत काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. मृत्यूची संख्या वाढते ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
त्यामुळे आणखी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही थोरात यांनी सांगितले. त्यामुळे सुरुवातीला राज्यात लॉकडाऊन करण्यास ना.थोरात यांनी कडाडून विरोध केला होता.
मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने थोरात बॅकफूटवर आले असून ना.थोरात यांनीच आणखी कडक निर्बंध राज्यात लागू करण्याबाबत सुतोवाच केले
आहेत. त्यामुळे थोरात हेदेखील तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनला अनुकूल असल्याचे बोलले जात आहे.