अहमदनगर Live24 टीम, 2 जुलै 2021 :- जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे.जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. या मृत्यू तांडावात अनेकांची जवळची माणसे, नातेवाईक, मित्र परिवार गमावला.
यात शिक्षक देखील सुटले नाहीत. कोरोनाच्या दुसर्या लाटेत जिल्ह्यातील तब्बल १४३ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. यात ९४ माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर, तर ४५ माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे.
यामध्ये ज्या शिक्षक व कर्मचार्यांना रुग्ण सर्वेक्षण, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोविड सेंटर, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी नेमणूक झालेली होती. त्यांना शासनाचे ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.
विशेष म्हणजे या मृत पावलेल्या शिक्षकांमध्ये ११ माध्यमिक शिक्षकांनी कोविड ड्युटी केलेली आहे. तर ५ शिक्षक हे नव्याने नोकरीला लागलेले असल्याने त्यांना सरकारकडून पेन्शन आणि ग्रॅज्युटीलचा लाभही मिळणार नाही.
याबाबत अहमदनगर जिल्हा माध्यमिक संघाचे लांडे यांनी सांगितले की,कोरोनामुळे बळी गेलेल्या शिक्षकांना सरकारकडून विमा कवच मिळावे यासाठी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्यासह जिल्हा पातळीवर शिक्षणाधिकार्यांना पत्र दिलेले आहे.
काही शिक्षक हे २००५ नंतर नोकरीस असल्याने त्यांना सरकारच्या नियमनूसार पेन्शनचा ही लाभ मिळणार नाही. यामुळे सरकारने या शिक्षकांच्या परिवराचा सहनुभूतीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे.