अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- सध्या देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यात अनेक नागरिकांचा बळी जात आहे.
ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत ग्रामसेवक देखील अविरत प्रयत्न करत आहेत.
मात्र ग्रामीण भागात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कर्तव्य बजावणार्या जवळपास ३९ ग्रामसेवकांचा यात बळी गेला आहे.
तरी ग्रामसेवक संवर्गाला कोरोनाने मृत्यु झाल्यास शासनाने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच दिलेले आहे. राज्यातील कोरोनाच्या दुसर्या लाटेत ग्रामसेवकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यु झाला आहे.
त्यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये विमा कवच सानुग्रह अनुदान मंजूर करावे. अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे व सरचिटणीस प्रशांत जामोदे यांनी केली आहे.
याबाबत युनियनने मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील वर्षीही काही ग्रामसेवकांचा कर्तव्य बजावताना कोविड संसर्ग होवून दुर्दैवाने मृत्यू झाला.
त्यापैकी सप्टेंबर ते डिसेंबर २०२० या कालावधीतील काहींचे विमा कवच प्रस्ताव प्रलंबित आहे. याशिवाय चालू वर्षीही ग्रामसेवक अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत.
काम करताना त्यांना संसर्ग होत आहे. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील३३ ग्रामसेवकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
त्यांचे प्रत्येकी ५० लाखांचे विमा कवचाचे प्रस्ताव तात्काळ मंजूर करावेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेवून मयत ग्रामसेवकांच्या कुटुंबातील पात्र वारसास विशेष बाब म्हणून जिल्हा परिषद सेवेत नोकरी देण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.