अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे, यावर उपाययोजना म्हणून प्रशासन युद्धपातळीवर लसीकरण मोहीम देशात राबवत आहे.
मात्र धडकी भरवणारी आकडेवारी दरदिवशी सुरूच आहे. यातच एक आशेचा किरण देशवासियांसाठी समोर आला आहे.
Zydus Cadila या कंपनीचं Virafin हे औषध करोनावरील उपचारांसाठी म्हणून देशात वितरीत करण्यासाठी DCGI अर्थात Drugs Controller General of India नं मान्यता दिली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी हे औषध डॉक्टरांच्या परवानगीने वापरता येणार आहे.
या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निकाल सकारात्मक असून औषध दिल्यानंतर 7 व्या दिवशी करोनाबाधित व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह येत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
झायडसनं जाहीर केलेल्या निकालांनुसार, हे औषध यशस्वी ठरण्याचं प्रमाण तब्बल 91.15 टक्के आहे.
अर्थात, हे औषध दिलेल्या करोनाबाधितांपैकी 91.15 टक्के रुग्णांचे अहवाल हे 7 दिवसांमध्ये निगेटिव्ह आले आहेत.
विराफीनचा एकच डोस द्यावा लागत असून तो इतर आजारांवरील इंजेक्शन्सप्रमाणेच त्वचेच्या खाली द्यावा लागत असल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.