कोरोनामुळे ग्रामस्थ त्रस्त; परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-कोरोना संसर्गामुळे शेवगाव तालुक्यातील ठाकुर निमगाव येथील ग्रामस्थ त्रस्त असतांना प्रशासनाने मात्र केवळ एक आढावा बैठक घेवून थातुरमातूर उपाययोजना करत गावाला दैवाच्या हवाल्यावर सोडले आहे.

गावातील नागरीकांच्या कोरोना चाचण्यासाठी अँन्टीजन कीट उपलब्ध नाही. विलगीकरण कक्षातील नागरीकांना सुविधा नाहीत. आरटीपीसीआर चाचण्यांचे रिपोर्ट उशीरा येत असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

अशा परिस्थितीत ग्रामपंचायत प्रशासन कोरोना विरोधात एकाकी लढत आहे.ठाकुर निमगाव येथील कोरोना संसर्गाने रौद्ररुप धारण केले असून आतापर्यंत गावात १०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनामुळे आठवडाभरात गावातील ११ जणांचा बळी गेला आहे.

प्रत्येक घरात बाधीत रुग्ण असल्याने चाचण्याअभावी इतरही व्यक्तींना संसर्गाची बाधा होत आहे. गावातील वाढता संसर्गामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून, अनेक जणांनी गाव सोडून शेतामध्ये वस्तीवर राहणे पसंद केले आहे.

गावातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभुमीवर तालुका प्रशासनाने मंगळवारी गावात तहसीलदार अर्चना भाकड-पागिरे, गटविकास अधिकारी महेश डोके, डॉ.सुरेश पाटेकर यांनी आढावा घेवून परिस्थितीची पाहणी केली.

त्यामध्ये गावातील विलगीकरण कक्ष सुरु करणे, गाव आठ दिवस कडकडीत बंद करणे, लक्षणे असणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करणे. अँन्टीजेन कीट उपलब्ध करुन गावात रँपीड टेस्ट घेणे आदी निर्णय घेण्यात आले. मात्र त्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागाने आरोग्य सर्वेक्षणाव्यतिरीक्त फारशा उपाययोजना केल्या नाहीत.

त्यामुळे कोरोना विरुध्दच्या लढाईत ग्रामपंचायत प्रशासन एकाकी लढत असल्याचे चित्र आहे. विलगीकरण कक्षातील नागरीकांना जेवणाचे डब्बे पुरवणे, रुग्णवाहीका भाड्याने घेवून गावातील नागरीकांना चाचण्यांसाठी शेवगाव येथे नेणे ही कामे ग्रामपंचायतीला लोकवर्गणीतून करावी लागत आहेत.

अनेक कुटूंबातील सर्वच व्यक्ती बाधीत असल्याने त्यांच्या जेवणाच्या व इतर मुलभूत गरजांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने ग्रामपंचायतीस सहकार्य करुन या संकटावर मात करण्यासाठी मार्ग काढायला हवा.

अन्यथा संर्गाची साखळी गावामध्ये आणखी मोठया प्रमाणावर वाढून परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24