अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :-जलसंधारणाच्या कामात राज्यातच नव्हे, तर देशात, परदेशात नावलौकिक मिळवणाऱ्या हिवरेबाजार कोरोना रोखण्यातही आदर्शगाव ठरले आहे.
कोरोनाची लक्षणे दिसताच विलगीकरण कक्षात उपचार दिल्याने आम्हाला रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यात यश मिळाले आणि रुग्ण बरे होण्यातही मदत झाली. रुग्णांना लक्षणे दिसताच उपचार केले गेले. त्यामुळे आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये आजघडीला केवळ एक रुग्ण आहे.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, मार्च महिन्यात या गावात पहिला रुग्ण कोरोनाबाधित सापडला. त्यानंतर गावातील काही शिक्षक, तरुण आणि नोकरदार वर्ग यांच्या सहकार्याने चार टीम तयार करून सर्वेक्षण करून बघितले. त्यात लक्षणांच्या आधारावर माहिती घेतली.
32 जण त्या लक्षणांनुसार बाजूला काढले. आरटीपीसीआरचा रिपोर्ट यायला वेळ लागतो. त्यामुळे जिल्हा उपकेंद्रात अॅण्टीजेन टेस्ट करून घेतल्या त्याचे अहवाल येण्याआधी त्या सर्वांना गावातील प्रशिक्षण केंद्रात त्याची रवानगी करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले.
त्यांना त्याच ठिकाणी सर्व उपचार आणि मदत देण्यात आली. अशा पद्धतीने कोरोना रोखण्यात आम्ही यशस्वी ठरलो. हिवरे बाजार गावात मार्च ते मे महिन्यापर्यंत 52 रुग्ण होते. त्यापैकी दुर्दैवाने एक रुग्ण दगावला तर चार रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागली होती.
पण सगळे आता व्यवस्थित आहे. गावात 200 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले असून उर्वरित नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्याशिवाय गावात जे नागरिक नोकरीकरिता बाहेर जातात, दूधसंकलनासाठी गावात ये-जा करतात किंवा बाहेरून जे मजूर शेतीच्या कामासाठी येतात त्यांच्यासाठी नियमावली बनवली आहे
त्याचे पालन प्रत्येक जण करीत आहे. मी आजही आमच्या गावातील जे रुग्ण आजारी पडतात त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना समुपदेशन करत असतो. कोरोनावर मात करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असते, असेही पवार म्हणाले.