अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-आज एकीकडे आपण विविध उपाय करत कोरोनावर नियंत्रण मिळवले असतानाच दुसरीकडे मात्र राज्यातील अनेक भागात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.नगर जिल्ह्यातही रूग्णसंख्या वाढु लागली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. कोविड केअर सेंटरसह सर्व वैद्यकीय सुविधा पुन्हा सज्ज करण्याचा आदेशही देण्यात आले आहे. त्यानुसार सर्व विभागांना आणि अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
करोनाचा प्रभाव ओसरला म्हणून बंद करण्यात आलेली कोविड केअर सेंटर, विलगीकरण केंद्र आणि अन्य सुविधा पुन्हा अद्ययावत करण्याचा आदेश देण्यात आला आहे, कोणत्याही क्षणी आलेल्या रुग्णांसाठी ही यंत्रणा सज्ज होईल, अशी व्यवस्था करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पूर्वी करोना रुग्ण आढळून आला की त्याच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची चाचणी घेतली जात होती. ती पद्धत पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
एखाद्या परिसरात जास्त संख्येने रुग्ण आढळून आल्यास तेथे प्रतिबंधित क्षेत्र (कंटन्मेंट झोन) करण्याचा आदेशही देण्यात आला आहे त्यामुळे आता आपल्याला अधिक काळजी घेण्याची आवशकता असून,प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.
त्याच सोबत आपली व आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करावे .कोणत्याही परिस्थितीत गर्दी न करता साध्या पद्धतीने कार्यक्रम करावे असे आवाहन करण्यात आले आहे.