अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात आज अखेरपर्यंत सव्वासहा लाख जणांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलेले आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
जिल्ह्यात सुरवातीला फ्रंटलाइ वर्कर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपुढील नागरिक लसीकरण करण्यात आले. तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाचा टप्पा सुरू करण्यात आलेला होता;
मात्र लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने हे लसीकरण सध्या थांबवावा लागला. जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, महसूल, पोलिस, पंचायतराज, गृह व शहरी कामकाज, रेल्वे सुरक्षा दल,
ज्येष्ठ नागरिक, अशा एकूण पाच लाख 62 हजार 249 जणांनी लसीकरणासाठी नोंदणी केली होती. त्यांतील चार लाख 82 हजार 39 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आलेला आहे.
एक लाख 34 हजार 221 जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आलेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पहिला व दुसरा डोस एकूण सहा लाख 15 हजार 260 जणांना देण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात सध्या लसींचा तुटवडा जाणवू लागलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबविण्यात आलेले आहे. मात्र, लस घेण्यासाठी नागरिकांची रीघ लसीकरण केंद्रांवर रोज लागत आहे.