कोरोना योध्दांना ढालप्रमाणे किटचा उपयोग -आमदार निलेश लंके

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- टाटा पॉवरच्या वतीने फ्रन्टलाईन कामगार व आरोग्य केंद्रासाठी कोरोना प्रतिबंधक अत्यावश्यक किटसह आयुर्वेदिक अश्‍वगंधचूर्ण व मसालाचहा चूर्ण चे वाटप करण्यात आले.

या अभियानाचे प्रारंभ आमदार निलेश लंके यांना किटचे वितरण करुन करण्यात आले. टाटा समूह कोरोनाच्या संकटकाळात योगदान देत असताना सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने त्यांचे उपक्रम सुरु आहेत.

कोरोना प्रतिबंधक अत्यावश्यक किट मध्ये बचत गटाच्या महिलांनी बनवलेले एन 95 च्या मुखपट्टया, हर्बल सॅनीटायझर, अश्‍वगंध, मसाला चहा चुर्ण, पॅरासेटीमॉलच्या गोळ्या व पीपीई किटचा समावेश करण्यात आला आहे.

आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात टाटा पॉवरच्या वतीने राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन, फ्रन्टलाईन कामगार व आरोग्य केंद्रासाठी देण्यात येणार्‍या वस्तू उच्च प्रतीचे असून या लढ्यात कोरोना योध्दांना ढालप्रमाणे त्याचा उपयोग होणार असल्याचे सांगितले.

तसेच ग्रामीण भागातील महिलाना कोरोना काळात रोजगाराच्यासंधी उपलब्ध करुन देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी टाटा पॉवरने आरोग्य केंद्रासाठी मदत करुन कर्मचार्‍यांना कोरोनाशी लढण्यासाठी बळ दिले आहे.

त्यांनी दिलेल्या किटचा निश्‍चित फायदा होणार असल्याचे सांगितले. पारनेरचे गट विकास अधिकारी माने यांनी गावपातळीवरील कर्मचार्‍यांना कोरोनापासून बचावाकरिता संरक्षण मिळणार असल्याचे स्पष्ट केले.

टाटा पॉवर कंपनीचे सीएसआर अधिकारी विश्‍वास सोनवले यांनी कोरोना काळात स्वत: व कुटुंबाची पर्वा न करता सर्वसामान्यांसाठी झटणार्‍या फ्रन्टलाईन कामगारांच्या कार्याला सलाम आहे.

त्यांना समोर ठेऊन त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने हा उपक्रम राबविल्याचे सांगितले. यावेळी टाटा पॉवरचे प्रवीण वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लाळगे, डॉ. सौ. गुंजाळ, शहांजापुरचे माजी सरपंच अण्णा मोटे आदी यावेळी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24