अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- जिल्ह्यातील ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण संचार करणाऱ्या नागरिकांची आता अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे.
तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. याच अनुषंगाने संगमनेर मध्ये कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी विनाकारण फिरणार्यांवर कडक कारवाई करावी, तसेच त्यांची रॅपिड अॅन्टीजेन चाचणी करण्यात यावी, अशा सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.
त्यानुसार काल संगमनेर बस स्थानकासमोर पोलिस प्रशासनाने मोटारसायकलवर विनाकारण फिरणार्यांना थांबवत त्यांची रॅपिड अॅन्टीजेन चाचणी केली.
दिवसभरात 100 नागरीकांची चाचणी करण्यात आली त्यामध्ये 4 व्यक्ती करोना बाधीत आढळून आले आहे. दरम्यान या कोरोनाबाधित रुग्णांची रवानगी करोना केअर रुग्णालयात करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. यावेळी संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, तहसिलदार अमोल निकम हे उपस्थित होते.