अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्दी, खोकला, थंडी, ताप व तोंडाची चव जाणे, अशा आजारांचा अनेकांनी धसका घेतला आहे.
मित्र परिवारात किरकोळ आजारावरून आता ‘अण्णा’, ‘बापु’, ‘तात्या’, ‘भाऊ’, ‘दादा’ ‘तुम्ही खोकु नका, दवाखान्यात जा’ असा सल्ला दिला जात असल्याचे ग्रामीण भागात सध्या दिसून येत आहे.
कोरोनाच्या तडाख्यात अनेक कुटुंबांना आर्थिक फटका बसला. काहींच्या घरातील कर्ते स्त्री- पुरुष, वयोवृद्ध कोरोनाने हिरावले. आर्थिक फटका भरुन काढता येईल.
मात्र, चालता बोलता कुटुंबातील सदस्य कोरोनाग्रस्त झाला तर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी लागणारे लाखो रुपये आणायचे कुठून? याचा देखील सर्व सामान्यांनी धसका घेतला आहे.
हाताची स्वच्छता, सोशल डिस्टेन्स, दहावे, तेरावे, गर्दीचे कार्यक्रमांना विनाकारण जायचे नाही. गेले तरी बाहेर बसून भेटीगाठी घेणे. मास्कचा वापर करणे, वायफट खर्च न करणे, अशी काळजी घेतली जात आहे.
रात्रीच्या धाब्यावर तर कधी परमीट रुममध्ये होणाऱ्या ‘रंगित संगित’ पार्टी वर देखील परिणाम झाल्याने यांचा मोठा फटका महामार्गावर असलेल्या हॉटेल चालकांना बसला आहे.
थोडीफार परिस्थिती सुधारणा होत असताना नव्याने वाढत असलेल्या कोरोनामुळे अनेकांनी प्रवास देखील टाळत असल्याने शिर्डी परिसरात गर्दी कमी झाली असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.