अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- देशात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे.
यातच बाधितांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. यामुळे पुन्हा एकदा चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात आतापर्यंतच्या सर्वोच्च कोरोनाबाधित रूग्णांची नोंद दररोज होत आहे.
त्यातच गेल्या 24 तासात तब्बल 4 लाख 03 हजार 738 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
गेल्या 24 तासात एकुण 4 हजार 092 रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असल्याचं बोललं जात आहे.
मागच्या 24 तासात देशात 3 लाख 86 हजार 444 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. त्याचबरोबर, सध्या भारतात एकूण 37 लाख 36 हजार 648 सक्रिय रूग्णसंख्या आहे.
देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून,
रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे.