अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- पारनेरच्या वाढत्या रुग्ण संख्येला लग्न सोहळे चांगलेच भोवत असल्याचे दिसत आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी तालुका प्रशासनाने लग्न समारंभात मोठ्या प्रमाणावर करोना चाचण्या केल्या.
सोहळ्यास उपस्थितांची चाचणी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट काल आले. गेल्या 24 तासात तालुक्यात 158 करोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रत्येक लग्नसमारंभात किमान पाच तरी करोना बाधित आढळून येत असल्याचे या चाचणीमधून स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता नागरिकांनी लग्नसमारंभ व इतर कोणत्याही गर्दीच्या कार्यक्रमाला जाणे टाळावे आणि घरातूनच किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.
नागरिकांच्या या निष्काळजीपणामुळे करोना रुग्णांच्या संख्येत पारनेर तालुका पुन्हा नगर जिल्ह्यात टॉपवर आला आहे. ही गावे आजपासून पूर्णतः बंद कोरोनाच्या पार्शवभूमीवर कळस, किन्ही या गावांबरोबरच पाडळी, कान्हूर, करंदी, वडझिरे, देवीभोयरे,
जवळा, बुगेवाडी, वरखेडमळा ही गावे आजपासून पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेशिवाय याठिकाणी काहीही चालू राहणार नाही.
या गावांमधून शंभर टक्के चाचण्या करण्यात येणार असून बाहेरच्या व्यक्ती गावात आल्यास त्यांना जि. प. शाळेत क्वारंटाईन करण्यात येणार आहे, अशी माहिती देवरे यांनी दिली.