अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-राहाता तालुक्यात मोठ्या प्रमाणावर करोना रूग्ण वाढत असून राहाता शहरात रोज पंचवीसच्या पुढे रुग्ण आढळत आहेत.
नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार राहाता तालुक्यात करोनाचा उद्रेक झाला असून गेल्या 24 तासात तालुक्यात तब्बल 140 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. रुग्णाची दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता
नगर जिल्ह्यातील हा तालुका लॉकडाऊनकडे वाटचाल करताना दिसून येत आहे. सर्वाधीक रुग्ण राहाता, शिर्डी, लोणी, कोल्हार व पाथरे येथे आढळून आले. गेल्या 24 तासांत तालुक्यात 140 रुग्ण पॉझीटिव्ह सापडले असून
यात सर्वाधीक राहाता शहरात 29 जण, शिर्डीत 25 जण, लोणी बु. 13 व लोणी खुर्द 13, कोल्हारमध्येे 17 रुग्ण, पाथरे गावात 11 रुग्ण, साकुरी 7 जण, अस्तगावात 5 रुग्ण, निर्मळ पिंप्री 4 जण तसेच पिंपळस,
रांजणखोल, डोर्हाळे, पुणतांबा, बाभळेश्वर, वाकडी, तिसगाव, दाढ, चंद्रपूर, या गावांमधेही करोनाने डोके वर काढले आहे.
आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणावर चाचण्या व खबरदारी घेतली जात असतानाही राहाता तालुक्यातील करोना बाधितांचा आकडा कमी होण्याऐवजी त्यात रोज दुप्पटीने वाढ होत असल्याने प्रशासन चिंतेत पडले आहे.
गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यात रुग्ण वाढ होत असून सर्वाधीक रुग्ण प्रथमच तालुक्यात सापडल्याने तालुक्याची लॉकडाऊनकडे वाटचाल सुरू झाल्याचे बोलले जात आहे.