कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी आता एवढ्या रुपयात होणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :-  कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी ३५० रुपये आकारण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.

तर रॅपीड अँटीजेन टेस्टसाठी रुग्ण प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास १००, १५० आणि २५० असे दर आता निश्चित करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षापासून जाणवत आहे.

त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर सातत्याने निश्चित करण्यात येत असून आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा या चाचण्यांच्या दरात सुधारणा केली आहे.

निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता कोरोना चाचण्यांसाठी ३५०, ५००, आणि ७०० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.

संकलन केंद्रावरुन नमूना घेऊन त्याची वाहतूक आणि अहवाल देणे या सर्व बाबींसाठी रुग्णाकडून ३५० रुपये आकारले जातील. रुग्णालय,

कोविड केअर सेंटर, कॉरंटाईन सेंटर मधील प्रयोगशाळा येथून नमूना तपासणी आणि अहवाल यासाठी ५०० रुपये तर रुग्णाच्या निवासस्थानावरुन नमूना घेवून त्याचा अहवाल देणे यासाठी ७०० रुपये आकारण्यात येणार आहेत.

राज्यात कोणत्याही खासगी प्रयोगशाळेला या कमाल मर्यादेपेक्षा जास्त दर आकारता येणार नाही, असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office