अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून कोरोनाने जिल्ह्यात कहर केला आहे. यामुळे अनेकदा लॉकडाऊन करण्यात आले. कठोर निर्बंध लावण्यात आले. मात्र नागरिकांची सतर्कता व प्रशासनाचे योग्य नियोजनामुळे आता कोरोना जिल्ह्यातून पायउतार होऊ लागला आहे.
यातच नगर तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर येऊ लागली आहे. नांगर तालुक्यातील ११० गावांपैकी ६४ गावे सध्या कोरोनामुक्त झाली आहेत. ४६ गावांमध्ये एकूण ११६ सक्रिय रुग्ण आहेत. १८ गावांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या एक आहे.
आठ गावांनी सक्रिय रुग्णांची संख्या दोन आहे, तर उर्वरित २० गावांतील सक्रिय रुग्णांची संख्याही दहाच्या आतच असल्याने नगर तालुक्याला कोरोनातून मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एप्रिल ते मे महिन्यांत तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या प्रति महिना तीनशेच्या पुढे होती.
जुलै महिन्यात तालुक्यात २०२ सक्रिय रुग्ण होते. ऑगस्टमध्ये १६०, तर सध्या ११६ सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिसून येते. आजपर्यंत एकूण बाधित रुग्ण १७ हजार १२९ आढळून आले आहेत. ५६० जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुक्याची लोकसंख्या १ लाख ३९ हजार ९४४ एवढी आहे. सध्या ४६ गावांमध्ये सक्रिय रुग्ण असले तरी रुग्ण संख्या अत्यल्प आहे. दरम्यान गेली पाच महिने धुमाकूळ घातलेल्या कोरोनाने आता नगर तालुक्यातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे.
एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी मात्र गणेश विसर्जन व इतर सणासुदीत काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.