अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-कोव्हिडची तपासणी केली व रिपोर्ट पॉझिटिव्ह आला मात्र कोव्हिड सेंटरला जाण्यासाठी रुग्णवाहिकेची तासंतास वाट पहावी लागत
असल्याचे विदारक दृश्य सध्या पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार प्राथमिक आरोग्य केद्रांमध्ये घडताना दिसत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात व मराठवाड्याच्या सरहद्दीवर असणार्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोव्हिडची चाचणी केली जात आहे. मात्र येथे कोव्हिड सेंटर नसल्याने येथे करोना पॉझीटिव्ह रुग्णाला पाथर्डी व मोहटादेवी येथील कोव्हिड सेंटरला भरती व्हावे लागते.
खरवंडी कासार पासून हे अंतर 25 किलो मिटर असून तेथे जाण्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध होत नाही तर शासकीय अॅम्ब्युलन्स वेळेवर येत नसल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे.
शुक्रवारी सकाळी कोव्हिडची तपासणीसाठी दाखल झालेल्या रुग्णांची सकाळी 11 वाजता त्यांची तपासणी झाली. त्यामध्ये सात व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या. त्यामध्ये या परिसरातील सरपंचाचे पतीही होते.
त्यांना कोव्हिड सेंटरला जाण्यासाठी दुपारी 4 वाजेपर्यंतही वाहन आले नव्हते. त्यांना कोव्हिड सेंटरला घेऊन जाण्यासाठी वाहन न आल्याने उपाशीपोटी हे रुग्ण तिथेच बसून राहिले होते.
आरोग्य विभागाचा सुरु असलेला हा निष्काळजीपणा रुग्ण वाढीस कारणीभूत ठरतो आहे. यामुळे या घटनाला आळा बसावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक वाटू लागले आहे.