अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- वारस हक्काची नोंद करण्यासाठी तलाठी व कोतवाल या दोघांनी चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोघांनाही नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली.
तलाठी स्वाती बबनराव झुराळे व कोतवाल संदीप लक्ष्मण तांबे (रा. निमगावजाळी, ता. संगमनेर) अशी दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील तक्रारदार यांच्या आजोबांच्या मृत्यपत्रानुसार वडील व चुलते यांच्या वारसा हक्काची नोंद सातबारा उताऱ्याला करण्यासाठी कामगार तलाठी स्वाती बबनराव झुरळे यांच्याकडे अर्ज दिला होता.
मात्र, तलाठी झुरळे हे वारसा हक्काची नोंद करण्यासाठी टाळाटाळ करत ती नोंद करण्यासाठी कोतवाल संदीप तांबे यांच्यामार्फत चार हजार रुपयांची १३ सप्टेंबर रोजी मागणी केली.
वारंवार विनंती करूनही नोंद होत नसल्याने तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्याच्या तक्रारीवरून सापळा रचत कोतवाल संदीप तांबे यास लाच घेताना ताब्यात घेतले.
त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चार हजार रुपये रोख मिळून आले. त्याची चौकशी केली असता कामगार तलाठी स्वाती झुरळे यांचे ते पैसे असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.