अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-नगर शहरातील रस्त्याच्या कामासाठी तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर काही महिन्यातच खड्डे पडले.
यामुळे शहरासह जिल्ह्यातील रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
दरम्यान नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी नांगर दौऱ्यावर आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले.
या निवेदनात म्हंटले आहे कि, नगर शहरातील रस्त्याच्या कामासाठी तसेच रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर काही महिन्यातच खड्डे पडले.
रस्त्याच्या कामात मोठा घोटाळा झाला. नगर शहर, नगर तालुकासह संपूर्ण जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिकेतील बांधकाम विभागाने रस्त्याचे मोठ्या प्रमाणात कामे केली.
परंतु, काही दिवसांत रस्त्यांमध्ये मोठे खड्डे पडले असून, संपूर्ण नगर शहर सध्या खड्ड्यात आहे. तपोवन रस्त्याच्या कामात ठेकेदाराने डांबर खाल्ले तर अधिकाऱ्याने मलिदा खाल्ला, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या नगर शहरासह पाथर्डी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, राहुरी, नगर तालुक्यातील कामांची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.