अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- कोरोनामुळे जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आलेल्या आहेत. तर इतर सर्व दुकाने व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.
मात्र संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथे बेकायदेशीर देशी दारूचे दुकान सुरु आहे.या दुकानाकडे ग्रामपंचायत प्रशासनासोबतच उत्पादन शुल्क च्या स्थानिक अधिकार्यांचेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील कासार दुमाला येथे गेल्या दोन वर्षांपासून हे देशी दारूचे दुकान सुरू आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता या दुकानाची जागा बदलण्यात आली आहे. यासाठी चक्क भुमी अभिलेख खात्याचा खोटा दाखला बनवून त्याचा गैरवापर संबंधिताने केला आहे.
ग्रामपंचायतीचाही कुठलाही दाखला नसताना हे देशी दारूचे दुकान खुलेआम सुरू आहे. हे देशी दारू दुकान बंद करण्यात यावे यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहे.
गावात देशी दारूचे दुकान खुलेआम सुरू असताना ग्रामपंचायतीने या दुकानाला अद्याप एकही नोटीस बजावली नसल्याची माहिती समजली आहे.
या दुकानामुळे गावातील वातावरण खराब होत आहे. शाळेतील मुले ही या दुकानातून दारू खरेदी करताना दिसतात. यामुळे पिढी बरबाद करण्याचे काम करणार्या या दुकानाचा परवाना त्वरीत रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.