अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- अहमदनगर शहरातील माळीवाडा परिसरात युवकावर १० ते १२ जणांच्या टोळक्याने खुनी हल्ला करत त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी (दि.२) सायंकाळी घडली.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अक्षय संतोष मुंदडा (वय २२, रा.दातरंगे मळा, नालेगाव) हा माळीवाडा परिसरातील हॉस्पिटल समोर उभा असताना १० ते १२ तरुण तेथे आले.
त्यांनी ‘तू परेरा बरोबर का राहतो?’ अशी विचारणा केली असता अक्षय मुंदडा याने ‘तो माझा मित्र आहे’ असे सांगितले. याचा राग येवून बाचाबाची झाली व मुंदडा यास हातोडीने डोक्यावर, तोंडावर मारहाण केली.
तसेच ‘तुला आता ठार मारतो’ असे म्हणत तेथे असलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्यास जबर मारहाण करत त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या बाबत अक्षय मुंदडा याने दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी १० ते १२ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे.