अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव, मुठेवाडगाव, भोकर, उंदीरगावच्या शेतकऱ्यांकडून सोयाबीन, मका आणि हरभरा खरेदी करुन पैसे न देता पसार झालेल्या रमेश मुथ्था आणि चंदन मुथ्था या व्यापाऱ्यांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
विजय शिताराम आसणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, मुथ्था यांनी आपल्याकडून १ लाख २२ हजारांचा व आपला मुलगा केशवकडून ४ लाख ३० हजारांचा शेतीमाल घेऊन बँकेचा चेक व कच्या पावत्या दिल्या.
मात्र, पैसे न देताच हा व्यापारी शनिवारी रात्री कुटुंबासह पसार झाला. भोकर येथील पोपट काळे यांचे १ लाख ५५ हजार ८००, गणेश जोशी यांचे ५४ हजार ९००, किशोर पटारे यांचे ४७ हजार,
सोन्याबापू विधाटे यांचे ६४ हजार ३९५, उंदीरगाव येथील शिवाजी राऊत यांचे ५ लाख १२ हजार अशी एकूण ११ लाख ८ हजार १७८ रुपयांची फसवणूक झाली. एकूण ४७ शेतकऱ्यांचे १६ लाख ६१ हजार १५३ रुपये येणे आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक मसूद खान करत आहेत. मुथ्थाने नातेवाईकाच्या दुकानातून माल खरेदी करुन किराणा व्यवसाय व धान्य खरेदीही सुरु केली.
शेतकऱ्यांना विश्वासात घेत लाखो रुपयांचे सोयाबीन, मका आणि हरभरा खरेदी केला. बाजारभाव वाढल्यानंतर मालाची रक्कम घेण्याचे आमिष दाखवून एका संस्थेच्या गोदामात तारण ठेवून ७५ टक्के रक्कम घेतली.