अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- नगर जिल्ह्यासह शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.
निर्बंध शिथील होताच अवैध धंद्यांत वाढ झाली आहे. यामध्ये दारू, मटका, जुगार, गुटखा, बिंगोचे धंदे जोरात सुरू झाले आहे. लोकांनी घराबाहेर पडण्यास सुरूवात केली आहे. यामुळे दारू, मटका, जुगारातून वाद वाढले आहे. या वादातून खून, खूनाचा प्रयत्न, हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत.
पोलीस दप्तरी दररोज गुन्हे दाखल होत आहे. तसेच दोन दिवसांमध्ये दोन खूनांच्या घटना घडल्या आहे. दोन्ही खूनाच्या घटना दारूच्या कारणातून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यामुळे अनलॉकनंतर शहरातील गुन्हेगारीत वाढ होण्यास अवैध दारू, मटका, बिंगो, जुगार कारणीभूत आहे.
शहर पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शहरातील दुचाकी, चारचाकी चोर्यासह घरफोड्या, दरोड्याच्या घटना वाढल्या आहेत. शहर पोलिसांकडून गुन्ह्यांची उकल होत नसल्याने गुन्हेगारांच्या टोळ्या वारंवार असे कृत्य करत आहे.
नागरिकांची सुरक्षा पोलिसांवर असून पोलिसांकडून गस्तीमध्ये वाढ केल्यास, गुन्ह्यांची उकल केल्यास, सराईत गुन्हेगारांच्या वेळीस मुसक्या आवळल्यास गुन्हेगारी रोखण्यात मदत होणार आहे.
एकीकडे शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आला असताना पोलिसांकडून अवैध धंद्यांवर मात्र कारवाई होताना दिसत नाही.
खुलेआम दारू विक्री, मटका-जुगार सुरू आहे. नेप्ती नाका येथे खुलेआम दारू विक्री सुरू आहे. मात्र कोतवाली पोलिसांकडून या दारू विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही.
तोफखाना, कोतवाली, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यासह तालुका, एमआयडीसी पोलिसांकडून शहरातील वाढत्या गुन्हेगारीकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याकडे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.