अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- महापालिका क्षेत्रातील के/पश्चिम विभागाअंतर्गत ओशिवरा परिसरात राहणारी अभिनेत्री गौहर खान हिच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ती कोरोनाबाधित असूनही सार्वजनिक परिसरामध्ये वावरली. एवढेच नव्हे, तर चित्रीकरणामध्ये सहभाग घेतला. परिणामी कोरोना संसर्ग इतर व्यक्तींना होऊ शकेल, अशा प्रकारची कृती केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अभिनेत्रीस महापालिकेच्या विलगीकरण केंद्रात दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
अभिनेत्रीची कोरोना चाचणी करण्यात आली होती. तिला कोरोनाची बाधा झाली असल्याचे ११ मार्च रोजी निष्पन्न झाले होते. तिने घरातच विलगीकरण पद्धतीने राहणे बंधनकारक होते, परंतु तिने नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक परिसरातील वावर सुरू ठेवला.
या अनुषंगाने के/पश्चिम विभागातील आरोग्य खात्याचे कर्मचारी १४ मार्च रोजी संध्याकाळी उशिरा तिच्या घरी गेले. वारंवार विनंती करूनही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तिचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासही तिने नकारात्मक प्रतिसाद दिला.
यानंतर एका समाजसेवकाच्या मदतीने विनंती केली असता, तिने दरवाजा उघडला. त्यानंतर विलगीकरणाचा शिक्का तिच्या हातावर उमटवण्यात आला.
अभिनेत्रीने कोरोना बाधा असूनही सार्वजनिक परिसरामध्ये वावरणे, चित्रीकरणात सहभाग घेणे, इतर लोकांना कोरोना संसर्ग होऊ शकेल, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल, असे कृत्य केल्याने तिच्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी तिच्यावर गुन्हा नोंदवला आहे.