अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- अरबी समुद्रात तयार झालेल्या द्रोणीय क्षेत्राचा प्रभाव म्हणून राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह विविध भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
या अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला मोठा फटका बसला असून शेतपिकं, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुंबईसह राज्यात आज दिवसभर अवकाळी पावसाची रिपरिप सुरुच आहे.
दिवसभरात पावसाने अजिबात विश्रांती घेतली नाही. हेच चित्र पुढचे 24 तास असणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान विभागाने राज्यात अलर्ट जारी केला आहे.
तसेच धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघरमध्ये पुढील 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. तर कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे. तरी मच्छिमारांनी या 24 तासामध्ये सुमद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.