पाणी टंचाईचे संकट ! थकबाकीअभावी पाणीपुरवठा योजनेची बत्ती गुल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- संगमनेर तालुक्यातील अनेक गावांना तळेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

सदर योजनेची वीजबिल तब्बल साडेसहा कोटीहून अधिक झाली आहे. त्यामुळे वीज बिल वसुलीसाठी महावितरणने योजनेचे वीज कनेक्शन खंडित केल्याचे योजना समितीचे सचिव सुरेश मंडलिक यांनी सांगितले.

तळेगाव प्रादेशिक योजनेद्वारे लाभार्थी गावांना पाणीपट्टीच्या रकमा ठरवून दिलेल्या आहेत. मात्र अपेक्षित पाणीपट्टी योजनेकडे जमा केली जात नाही. त्यामुळे या योजनेची वीज बिल थकबाकी 6 कोटी 63 लाख 91 हजार 150 रुपयांवर पोहचली.

योजना चालविण्यासाठी येणारा खर्च व दरमहा येणारे वीज बिल भरण्याकामी आर्थिक अडचण निर्माण होते. पाणी सर्वांनाच हवे, मात्र पाणीपट्टी नको, या मानसिकतेने अनेकांना ग्रासले. त्यामुळे योजना चालविण्यात आर्थिक अडचण निर्माण होते.

शिवाय पाणीपट्टी भरणार्‍या नळकनेक्शन धारकांना नियमित पाणी मिळत नाही. काही ग्रामपंचायती तर पाणीपट्टीचा भार हलका करण्यासाठी नळकनेक्शनची संख्या दडवीत आहेत.

योजना सुरळीत चालण्यासाठी लाभार्थी गावांच्या पदाधिकार्‍यांनी सकारात्मकता दाखविण्याची गरज आहे.

योजनेद्वारे लाभार्थी गावांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी व वीज बिल भरण्यासाठी लाभार्थी गावांना पाणीपट्टीच्या ठरवून दिलेल्या रकमा थकबाकीसह भराव्यात, असे आवाहन योजना समितीचे अध्यक्ष प्रभाकर कांदळकर व सचिव सुरेश मंडलिक यांनी केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24