अहमदनगर Live24 टीम, 5 ऑगस्ट 2021 :- सत्ताधारी पुढाऱ्यांवर प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. तालुक्यातील जनता वाऱ्यावर सोडून देण्यात आली आहे. तालुक्यात लॉकडाउनच्या नावाखाली नुसता पोरखेळ चालवला आहे. तालुक्यात कोवीड सेंटर चालविण्याचा आटापीटा चाललेला आहे.
शासकिय रुग्णालयांत जागा असतानाही कोवीड सेंटरमध्ये दबावाखाली रुग्णांची भरती कशासाठी केली जाते ? शासकिय यंत्रणा सक्षम नाही का? शासकिय रुग्णालयांना कोवीडसाठी येणारा निधी कोठे वापरला ? याचे उत्तर त्यांनी द्यावे. अशी टीका भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, एकीकडे तालुका प्रशासन व्यापाऱ्यांना उत्स्फुर्तपणे लॉकडाऊन पाळण्यास सांगत असताना दुसरीकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधी मात्र मोकाट आहेत. त्यांच्या सार्वजनीक कार्यक्रमांवर कोणतेही बंधन नाही.त्यांचे शेकडो नागरीकांच्या उपस्थितीत जाहिर कार्यक्रम पार पडत आहेत.
तालुक्यात कोरोनाची स्थिती गंभीर नाही. प्रशासन मात्र ती जाणीवपूर्वक गंभीर असल्याचे भासवित आहे. तालुक्यात दररोज चार हजार टेस्ट केल्या जातात. जिल्हयात नगर शहरासह कोठेही इतक्या मोठया प्रमाणावर टेस्ट केल्या जात नाहीत.
तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे प्रशासनावर कोणताही धाक राहिलेला नसून त्यांनी पोरखेळ मांडल्याची टीका चेडे यांनी केली आहे.