बापरे! चाकुचा धाक दाखवत सोळा लाखांचा ऐवज लुटला वृद्ध दाम्पत्यास बाथरुममध्ये कोंडून चोरटे पसार….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-एका बंगल्यात शिरून चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत एका वृद्ध दाम्पत्यास लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

३ चोरट्यांनी ज्येष्ठ दाम्पत्याच्या बंगल्यात प्रवेश करून चाकूच्या धाकाने घरातील काही रोख रकमेसह १६ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. दरम्यान चोर वृद्ध दाम्पत्यास घरातील बाथरुममध्ये कोंडून पसार झाले आहेत.

ही घटना पुण्यातील औंध परीसरात घडली. नंतर पीडित दाम्पत्यानी मुंबईत राहाणाऱ्या आपल्या मुलाला मेसेज केल्यानंतर शेजारील लोकांनी त्यांची सुटका केली आहे. या प्रकरणी ७३ वर्षीय ज्येष्ठ महिलेनं चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जेष्ठ दाम्पत्य साधू वासवानी नगर येथील सिंध सोसायटीत राहातात. याठिकाणी त्यांचा स्वतः चा बंगला असून घरात सध्या दोघंच वास्तव्याला होते. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून

दोघंही लग्नानंतर मुंबई याठिकाणी राहायला गेले आहेत. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या घरावर डल्ला मारल्याचं प्रथमदर्शिनी दिसत आहे. दरम्यान,  रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास ३ चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याच्या बंगल्यात प्रवेश केला.

यावेळी घरात कुक काम करत होता. तर जेष्ठ दाम्पत्य वरच्या मजल्यावर बसले होते. चोरट्यांनी कुकला चाकूचा धाक दाखवत हाताने मारहाण केली. यानंतर चोरट्यांनी घरातील तिघांनाही चाकूचा धाक दाखवत बेडरुममध्ये प्रवेश केला.

यावेळी त्यांनी बेडरुममधील कपाटात ठेवलेली ७० हजारांची रोकड, युएस डॉलर आणि इतर काही मौल्यवान वस्तूसोबत एकूण १५ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. यानंतर चोरट्यांनी तिघांना बाथरूममध्ये कोंडून पळ काढला.

शिवाय पोलिसांत तक्रार दाखल केल्यास माघारी येऊन जीवे मारू अशी धमकीही चोरट्यांनी यावेळी दिली आहे.

यानंतर वृद्ध दाम्पत्यांनी घडलेल्या घटनेची आपल्या मुंबईत राहणाऱ्या मुलाला मेसेजद्वारे दिली. त्यानंतर शेजारच्या लोकांनी त्यांची सुटका केली आहे. सध्या पोलिसांनी तीन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24