अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील खोकर परिसरात अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी दरवाज्यांचे कोयंडे तोडून ३० तोळे सोन्याच्या दागिण्यासह एक लाख ५५ हजार ४०० रुपये चोरुन नेल्याची घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याप्रकरणी माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध धाडसी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खोकर येथील कारेगाव रस्त्यावरील खंडोबा मंदिर परिसरात माजी सरपंच चव्हाण हे नेहमीप्रमाणे आपल्या कुटूंबासह घराच्या हॉलमध्ये झोपलेले होते.
तर मुलगा लोकेश हा शेजारच्या खोलीत झोपलेला होता. पहाटे दोन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा उत्तरेकडील दरवाज्याची कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
घरातील कपाटाची चावी शोधून कपाट उघडून उचका पाचक करून कपाटातील ३० तोळे सोन्याच्या दागिण्यासह एक लाख ४५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. तसेच चोरट्यांनी बाथरूम समोरील खोलीतील बंदूक घराबाहेर आणून टाकली.
चोरट्यांनी बँकेचे पासबुक, चेकबुक व न्यायालयीन कामकाजाचे कागदपत्रे देखील चोरुन नेल्याचे सकाळी उघडकीस आले. चोरीचा प्रकार चव्हाण व कुसेकर यांच्या सकाळी पाच वाजता लक्षात आला.
त्यांनी तत्काळ तालुका पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक साळवे यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली.
घटनास्थळी श्वान पथकाचे प्राचारण केल्यानंतर चव्हाण यांच्या शेतवस्तीपासून अर्धा किलोमीटर कारेगाव रस्त्याच्या दिशेने त्यांनी धाव घेतली. चोरट्यांनी चव्हाण यांच्या कपाटातून सहा तोळे सोन्याच्या चार बांगड्या, चार तोळ्यांचे मंगळसूत्र,
साडेतीन तोळ्याचा सोन्याचा हार, प्रत्येकी सहा तोळ्याच्या अकरा सोन्याच्या अंगठ्या, दीड तोळ्याचे कर्णफूल, प्रत्येकी पाच तोळ्याच्या सोनसाखळी, आडीच तोळ्याचे मनी,
दोन तोळ्याची नथ व सरसह ट्रॅक्टर खरेदीसाठी घरात आणून ठेवलेली १ लाख ४५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज पसार केला.