अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडून ३० हजार रुपये खंडणी स्विकारताना अरुण रोडे यास पोलीस उपनिरीक्षक उगले यांनी रंगेहाथ पकडले.
दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही रोडे तहसीलदार देवरे यांना धमकावत होता. माझ्यावर गुन्हा दाखल करु नका अन्यथा तुम्हाला मी पाहून घेईन असे तो वारंवार म्हणत होता.
झालेल्या या सर्व प्रकाराचे देवरे यांच्यासह तहसील कार्यालयात उपस्थित असलेल्या पोलिसांनी ध्वनीचित्रमुद्रण केले आहे. याप्रकरणी तहसीलदार देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.
अन्याय निर्मूलन समितीचा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे तालुक्यातील नदीपात्रांमधील वाळू उपसा व तहसिल कार्यालयातील इतर कामकाजा विषयी वारंवार तक्रारी करीत असे.
या तक्रारींना स्थानिक वर्तमानपत्रे,वृत्त वाहिन्या, समाज माध्यमातून प्रसिद्धी देऊन संबंधित बातम्या रात्री उशिरा तहसीलदार ज्योती देवरे यांच्या भ्रमणध्वनीवर पाठवत असे व असे प्रकार थांबवण्यासाठी देवरे यांच्याकडे पैश्याची मागणी करीत असे.
रोडेने तहसीलदार देवरे यांच्या भ्रमणध्वनीवर रात्री अपरात्री संदेश पाठवणे थांबवले नाही.त्यामुळे तहसीलदार देवरे यांनी याप्रकाराची कल्पना पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना दिली.खंडणी देण्याचे कबूल करा.
खंडणी स्विकारताना रोडेला पकडता येईल असे श्रीमती देवरे यांना बळप यांनी सुचवले. रोडे वारंवार भ्रमणध्वनीवरून खंडणीची मागणी करीत होताच. सुरूवातीला रोडेने पन्नास हजार रुपये मागितले.
तहसिलदार देवरे यांनी एवढी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवल्याने रोडेने तुम्हाला शक्य आहेत तेव्हढे पैसे द्या अशी मागणी केली. तहसीलदार देवरे यांनी तशी तयारी दर्शवल्यावर रोडे आज पैसे नेण्यासाठी तहसील कार्यालयात आला होता.
देवरे यांनी तशी कल्पना पोलिसांना दिली. तहसिलदार देवरे यांनी दिलेले तीस हजार रुपये,त्यांच्या दालनाबाहेर मोजत असतानाच पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस कर्मचारी भालचंद्र दिवटे, गहिनीनाथ यादव यांनी रोडेला रंगेहाथ पकडले आहे.