Shirdi News : दर्शनपास विक्री प्रकरणाची चौकशी करून महिनाभरात संबंधितावर गुन्हा दाखल करणार, असे लेखी आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर शिर्डीचे माजी नगरसेवक सुरेश आरणे यांनी उत्कर्षा रुपवते यांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले.
शिर्डीतील एका माजी नगरसेवकाने भाविकांना आरतीला पुढे उभे करण्याचे आमिष दाखवून एजटांच्या माध्यमातून जादा दराने पास विक्री करण्याचे प्रकरण गेल्या पंधरवाड्यात गाजले होते.
संस्थान प्रशासनाने पोलिसांत तक्रार दिली होती; मात्र संबधिताचे नाव उघड करून गुन्हा दाखल होत नसल्यामुळे सगळ्याच माजी नगरसेवकांकडे संशयाने पाहिले जात होते. यामुळे आरणे यांनी या प्रकाराची चौकशी करून गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते.
याची दखल घेत पोलिसांनी जादा पैसे घेऊन आरती, दर्शनपास विक्रीद्वारे भाविकांची फसवणूक करणाऱ्या प्रकाराची चौकशी करून संबंधित माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन शिर्डी पोलिसांनी दिल्यानंतर आरणे यांनी उपोषण सोमवारी पाचव्या दिवशी मागे घेतले.
आरणे यांच्या आंदोलनाची दखल वेळीच घेतली जात नसल्याच्या पार्श्वभुमीवर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भुजबळ व प्रकाश पगारे यांनीही दुपारपासून आमरण उपोषण सुरू केले होते.
दुपारनंतर राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांची भेट घेतली. त्यानंतर घडामोडींना वेग आला.
साईभक्ताला पास विक्रीसंदर्भात संस्थानने पोलिसांत लेखी तक्रार दिलेली आहे. यावर पोलिसांनी महिनाभरात चौकशी करून कारवाई करण्याची लेखी हमी दिल्यानंतर उत्कर्षा रूपवते व पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते लिंबूपाणी घेवून हे उपोषण मागे घेण्यात आले.