अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-शिर्डीनजीक निमगाव कोऱ्हाळे हद्दीत असलेल्या हेलिपॅड रोडनजीक एका बंद पडलेल्या हॉटेलच्या आवारात जळणासाठी लाकूडफाटा गोळा करत असताना केबलचे रिळ अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली.
ललिता बाबासाहेब पवार (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. ललिता पवार यांची घरची परिस्थिती हालाखीची होती. त्यामुळे त्या स्वयंपाक करण्यासाठी लाकूड फाटा गोळा करायच्या.
असेच त्या बुधवारी (दि. २४) येथील एका बंद असलेल्या हॉटेलमध्ये लाकडाच्या फळ्या गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी मोठ मोठे केबलचे रिळ ठेवलेले आहेत. फळ्या गोळा करत असताना अचानक एक केबलचा रिळ त्यांच्या अंगावर पडला.
रिळ अंगावरून गेल्याने त्या दबल्या गेल्या. यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचा आठ वर्षांचा मुलगा सौरभही होता. हा अपघात होताच सौरभने त्यांच्या अंगावर पडलेला रिळ हटविण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र रिळचे वजन इतके होते, की तो जागचाही हालला नाही.
घटना समजताच पोपट शिंदे, शिर्डी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक वैभव रुपवते, अविनाश मकासरे, चांगदेव जगताप, बंटी ठाकरे व शिर्डी पोलीस पथकाने तात्काळ जेसीबीच्या साह्याने त्यांना बाहेर काढले.
त्यांना उपचारासाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले; तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, विवाहित मुलगी व मुलगा असा परिवार आहे. घरची गरिबी असतानाही त्या एका निराधार आठ वर्षांच्या मुलाला आधार देऊन सांभाळत होत्या. याबाबत उशिरापर्यंत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्याचे काम सुरू होते.