अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात नांदूर्खी येथील एक रुग्ण उपचार घेत होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नातेवाईकांनी त्याचा मृतदेह नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सच्या चालकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली; परंतु कुणी ८०० तर कुणी ९०० रुपये मागितले. वास्तविक पाहता शिर्डी ते नांदूर्खी हे अंतर केवळ तीन ते चार किलोमीटरचे आहे.
येथील लोक फिरायला शिर्डीत येतात; मात्र इतक्याशा अंतरासाठी एवढे पैसे मागितल्याने नातेवाईक हतबल झाले. त्यांनी ॲम्ब्युलन्सच्या चालकांना विनविण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु उपयोग झाला नाही.
शेवटी नातेवाईकांनी मृतदेह नेण्यासाठी मालवाहतूक करणारा टेम्पो बोलावला. या टेम्पोत मृतदेह टाकून ते नांदूर्खीला निघून गेले.
या मृताच्या नातेवाईकांपैकी एकाने त्यांना झालेल्या त्रासाचा व्हीडीओ बनवून सोशल मीडियावर टाकला असून त्यात ‘आम्हाला कोणी न्याय देणार का’? असा आर्त सवाल केला आहे.या व्हीडीओची समाजमाध्यमांवर मोठी चर्चा होत आहे.
साईंच्या शिर्डीत मरण स्वस्त पण रुग्णवाहिका महाग झाल्याचे समोर आले आहे. शिर्डीत साईबाबा संस्थानची दोन रुग्णालये आहेत. येथे अत्यल्प फीमध्ये उपचार होतात. उपचारादरम्यान कमी पैशांत जेवण, नाष्ता व राहण्याची चांगली सोय होते.
त्यामुळे परिसरासह दूरहून अनेक जण शिर्डीत उपचारासाठी येण्यास पसंती देतात; परंतु जितके पैसे उपचारासाठी लागतात, त्यापेक्षा जास्त पैसे मृतदेह घरी नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सवर खर्च करावे लागतात. ही शोकांतिका आहे. साईबाबा संस्थानकडे रुग्णवाहिका आहेत.
त्याबरोबरच रुग्णालयाच्या बाहेरदेखील अनेक खासगी आणि सामाजिक संस्थांच्या रुग्णवाहिका उभ्या असतात;
परंतु तरीही तीन किलोमीटर अंतरावर मृतदेह नेण्यासाठी आठशे रुपये मागून अडवणूक केली जात असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे.