अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे लखनऊ येथील रुग्णालयात आज निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ४ जुलै रोजी कल्याण सिंह यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
त्यांची प्रकृती तेव्हापासून चिंताजनकच होती. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. कल्याण सिंह यांच्या निधनाने भाजपने राम मंदिर आंदोलनातील एक प्रमुख नेता गमावला आहे. दरम्यान, अयोध्येतील भव्य राम मंदिराचं दर्शन घेऊनच या जगाचा निरोप घेण्याची कल्याण सिंह यांची अंतिम इच्छा होती.
ही त्यांची इच्छा अधुरी राहिली. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. लखनऊ मधील एसजीपीजीआयमध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांना ४ जुलै रोजी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनकच होती.
दोन वेळा ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि राजस्थान व हिमाचल प्रदेशचे राज्यपाल देखील राहिले होते. जेव्हापासून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तेव्हापासून अनेकदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली होती.
कल्याण सिंह यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. राम मंदिर आंदोलनातील ते भाजपाचे एक प्रमुख नेते होते.
”कल्याण सिंह यांच्या निधानाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी राज्यात तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला जाईल. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी नरोरो येथे गंगा नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तसेच, २३ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी असेल. उत्तर प्रदेशातील भाजपचा दिग्गज नेता अशी कल्याण सिंह यांची ओळख होती.
कल्याण सिंह यांनी दोनवेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. १९९१ मध्ये प्रथम आणि नंतर १९९७ मध्ये दुसऱ्यांदा ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. उत्तर प्रदेशमधून संसदेतही भाजपकडून सिंह यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. मोदी सरकारच्या काळात राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.