अवैध दारूविक्रीची तक्रार केल्याने जीवे मारण्याच्या धमक्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील संचारबंदी काळात अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत तक्रार केल्याने दारू व्यावसायिकांकडून जीवितास धोका निर्माण झालेला असताना, पोलिस संरक्षण मिळण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संचारबंदी काळात घरपोच दारू विक्रीस दिलेली परवानगी पुर्णत: रद्द करुन, दारु विक्री बंद व्हावी व पारनेर तालुक्यातील वाईन शॉप, परमीटरुम चालक यांना राज्य उत्पादन शुल्कच्या अहमदनगर कार्यालयाने ऑनलाईन विक्रीच्या स्टॉकची प्रत मिळण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली होती.

या मागणीमुळे दारु विक्री करणार्‍या व्यावसायिकांचा रोष वाढला. त्यांनी इतर व्यक्तींच्या मार्फत धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे जिवितास धोका निर्माण झाला असल्याचे रोडे यांनी निवेदनात म्हंटले आहे. दारु विक्री नियमाने सुरु असल्यास केलेल्या तक्रारीला घाबरण्याचे कारण नव्हते.

मात्र पारनेर तालुक्यात टाळेबंदीत अवैधरित्या दारु विक्री सुरु असल्याने त्यांचा रोष वाढला आहे. अवैध दारू विक्री व्यवसाय बंद होण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अखेरपर्यंत लढा देण्यात येणार आहे.

जीवितास धोका निर्माण झाल्यास पारनेर तालुक्यातील अवैध वाळू व दारु व्यावसायिकांसह पोलीस प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने रोडे यांनी स्पष्ट केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24