Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना आता धमकीचे फोन येत असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत हे सतत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर बोलत आहेत. तसेच राज्यातील सरकार आणि कर्नाटक सरकारवर हल्लाबोल करत असल्यामुळे संजय राऊत यांना धमकीचे फोने येत असल्याचे बोलले जात आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कन्नड रक्षण वेदिकेकडून धमकी येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ही धमकी शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांच्या पत्राकार परिषदेनंतर येत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
तसेच शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांच्या पत्रकार परिषद बंद कराव्यात आणि त्यांना आवर घालावा असा इशारा देण्यात आला आहे. माझ्यावर हल्ला झाला तर तो हल्ला माझ्यावर नसून महाराष्ट्रावर हल्ला असेल असेही राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊत हे दररोज पत्रकार परिषद घेत आहेत. या पत्रकार परिषदांमध्ये संजय राऊत अनेक मुद्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधत आहेत.
बेळगाव सीमा प्रश्नावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तुमच्यावर रोज थुंकतोय, दररोज कानशिलात लगावतोय असे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला लगावला आहे.