जिल्ह्यात मृत्यूतांड्व; तीन दिवसात 100 बाधितांचा दुर्दैवी मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दररोज दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची भर पडत आहे. शुक्रवारी दिवसभर २ हजार २२ रुग्ण कोरोनाबाधित आढळले.

हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसून रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुडवडा निर्माण झाला आहे. यातच दरदिवशी कोरोनामुळे अनेकांचे प्राण जात आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जिल्ह्यात मृत्यूंचे तांडव सुरू झाले आहे.

शहरातील नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत गेले तीन दिवसांत सुमारे १०० मुत्यू झालेले असले तरी प्रशासनाच्या दफ्तरी मात्र केवळ १८ मृत्यूची नोंद आहे. अमरधाममध्ये दोन विद्युत दाहिन्या आहेत.

तेथे एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड तासाचा कालावधी लागतो. गुरुवारी दिवसभरात या दाहिन्यांमध्ये २० अंत्यसंस्कार झाले. मृतांचा आकडा मोठा असल्याने रात्री २२ अंत्यसंस्कार सामूहिकपणे ओट्यावर करण्यात आले.

त्यासाठी अंत्यसंस्कार सहायक मंडळाने लाकूड व गोवऱ्यांची व्यवस्था केली. अंत्यविधीवेळी नातेवाइकांना प्रवेश दिला जात नाही. महापालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराचे चार कर्मचारी हे काम अहोरात्र करत आहेत.

शुक्रवारी रात्री मृतदेह घेऊन येणाऱ्या शववाहिकांची अक्षरश: रांग लागली होती. शुक्रवारीही सायंकाळपर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता. रात्री हा आकडा आणखी वाढेल, असे सांगण्यात आले.

जिल्हा शासकीय रुग्णालयातून मृतदेह अंत्यविधीसाठी अमरधाम येथील स्मशानभूमीत आणण्यासाठी एकच शववाहिका आहे. साधारणपणे एका खेपेत ५ ते ६ मृतदेह जिल्हा रुग्णालयातून अमरधाम येथे आणले जातात.

एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधारपणे दीड तास लागतो. तोपर्यंत आणखी सहा मृतदेह आणून ठेवलेले असतात. खासगी रुग्णालयातील शववाहिकेतूनही मृतदेह अंत्यविधीसाठी आणले जातात.

नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमी ही शहरातील प्रमुख स्मशानभूमी आहे. तर उपनगरात केडगाव आणि रेल्वेस्टेशन परिसरातही स्मशानभूमी आहेत. असे असले तरी कोरोनाने मृत झालेले आणि इतर आजारामुळे किंवा वृद्धापकाळाने मृत झालेले

यांच्यावर नालेगाव अमरधाम येथेच अंत्यसंस्कार करण्यात येतात. इतर स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास तेथील स्थानिकांचा विरोध आहे. यामुळे नालेगाव अमरधाममध्ये ताण आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24