अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- शहरातील वसंत टेकडी, संदेशनगर येथील मागासवर्गीय कुटुंबाची जागा दडपशाहीने बळकाविणार्या लॅण्ड माफियावर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस उपअधिक्षक प्रांजली सोनवणे व आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले. यावेळी भीम आर्मी संघटनेचे शहराध्यक्ष सनी खरारे, उपाध्यक्ष राहुल लखन,
शहर सचिव नरेंद्र तांबोळी, उपसचिव धीरज बैद, नगरसेवक सुनिल त्रिंबके, धीरज सारसर, अॅड. सिध्दार्थ सोळंकी, संदिप कुडिया, गुड्डो कुडिया, नंदिनी कुडिया, आरती कुडिया, कोमलकुडिया, गणेश फरताळे, दिपक कुडिया, ईश्वर जगताप आदी उपस्थित होते.
वसंत टेकडी, संदेशनगर येथे ओमप्रकाश कुडीया आपल्या कुटुंबीयांसह राहत आहे. सन 2008 मध्ये कुडिया यांनी त्यांच्या राहत्या घरा समोरील मोकळी जागा अंबादास दगडू कीर्तने (रा. पाथर्डी) यांच्याकडून रीतसर विसार पावतीने घेतली होती.
सदर जागेचा कीर्तन यांनी परस्पर अनिल विक्रम पोटे यांच्याशी सौदा केला आहे. तसेच कागदपत्रे तयार करून घेतलेली आहे. त्यामुळे पोटे व त्यांचे हस्तक ही जागा खाली करण्यासाठी मागील एक आठवड्यापासून कुडिया परिवाराच्या सदस्यांना धमकावत आहे.
प्रत्यक्षात या लॅण्ड माफियांनी काही गुंड आणून जागा बळकावण्यासाठी कुडिया यांना जीवे मारण्याची धमकी दिली. कुडिया यांच्या मुलांना मारहाण, शिवीगाळ करुन सदर जागा खाली करण्यासाठी तगादा सुरु आहे.
या प्रकरणी वेळोवेळी तोफखाना पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता, लॅण्ड माफिया विरोधात गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप कुडिया परिवाराने केला आहे.
या प्रकरणात मागासवर्गीय कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी दडपशाहीने जागा बळकाविणार्या लॅण्ड माफियावर कारवाई करण्याची मागणी भीम आर्मी संघटनेच्यावतीने करण्यात आली.