अहमदनगर Live24 टीम, 11 मे 2021 :-कोरोना महामारी व टाळेबंदीत सर्वसामान्य जनता होरपळत असताना प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मकतेसाठी जास्तीत जास्त लसीकरण करणे,
महापालिकेच्या माध्यमातून गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करुन देण्यासह आंध्रप्रदेश, तामिळनाडूच्या धर्तीवर खाजगी दवाखान्यात मोफत उपचार उपलब्ध करुन देण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, आयटी सेलचे संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, प्रविण वाघमारे, दिपक गायकवाड आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. टाळेबंदी असूनही रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. खाजगी, सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना जागा मिळत नाही. ऑक्सीजन व व्हेंटिलेटर बेडची वानवा आहे.
प्रत्येक हॉस्पिटलवर रुग्णांचा मोठा ताण असल्याने ते सर्वांना आरोग्य सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे. एखाद्या कोविड सेंटरमध्ये रुग्ण भरती असल्यास रुग्णाची परिस्थिती खालवल्यास त्याला ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी मोठ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे.
अनेक ठिकाणी सुरु असलेल्या कोविड सेंटरमध्ये पुरेश्या सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या मानाने हॉस्पिटल व डॉक्टर कमी पडत आहे. ज्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहे,
त्याप्रमाणे कोरोना प्रतिबंध व रुग्णांना उपचार देण्यासाठी नियोजन होताना दिसत नाही. टाळेबंदीत नागरिकांना काही कामानिमित्त घराबाहेर पडत आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कोरोना लसीकरणसाठी ठराविक केंद्र न ठेवता पोलिओ लसीकरणप्रमाणे अंगणवाडी, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रभागनिहाय किंवा जवळच्या ठिकाणी लस उपलब्ध केल्यास एकाच ठिकाणी गर्दी न होता जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करता येणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण होण्यासाठी नियोजन करावे, पोलीओ लसीकरणाच्या धर्तीवर कोरोना लसीकरणाचे नियोजन करावे, खासगी रुग्णालयांकडून जास्तीचे बिल आकारले जात असताना
कोरोना रुग्णांचे बिल शासकीय यंत्रणेने मंजूर करावे व त्यांचे बिल भरण्यासाठी शासकीय कार्यालयात बिल भरणा केंद्र देखील निर्माण करावा, आंध्रप्रदेश, तामिळनाडूच्या धर्तीवर खासगी रुग्णालयात रुग्णांवर मोफत उपचार व्हावे किंवा 50 टक्के खर्च शासनाने उचलावे,
कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल व इतर शासकीय ठिकाणी फक्त 45 वयो वर्षाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू असून, तेथे 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध करुन द्यावी, अहमदनगर महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची सुविधा निर्माण करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.