file photo

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  सरकारी अधिकारी म्हंटले कि लाचखोरी असे एकंदरीत गणित सर्वसामान्यांच्या मनात घट्ट झाले आहे. कोणतेही सरकारी काम पैशाबिगर होणारच नाही अशी जनभावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

अशीच काहीशी परिस्थिती पाथर्डी तालुक्यात निर्माण झाली आहे. ग्रामसेवक मनमानी करतात. लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सदस्यांनाही कामकाज करताना विश्वासात घेत नाहीत.

नैमित्तिक कामांतही रहिवाशांकडून आर्थिक अपेक्षा करतात. त्यामुळे त्यांची येथून तत्काळ बदली करा, अशी मागणी श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) चे सरपंच व कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पठारी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथ देवस्थान असल्याने भाविकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे नागरी समस्यांसह भाविकांच्या सोयी सुविधांबाबत सजग राहावे लागते.

परंतु, याबाबत ग्रामसेवक गांभीर्याने घेत नाहीत. कार्यालयीन वेळेतही ते उपस्थित नसतात. त्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्यांसह सरपंच, उपसरपंच यांनी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता त्यासही प्रतिसाद दिला जात नाही.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबतची पाहणी व पंचनामे करण्याचे कामांसाठीही अनास्था दाखविली जाते, असे निवेदनात म्हटले आहे. अशा अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.