अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-नागरिकांनी मुकाटपणे बिले भरावीत, अन्यथा पोलिस संरक्षणात बिल वसुली केली जाईल, हे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंचे विधान अत्यंत दुर्दैवी आहे.
त्यांनी तत्काळ राजीनामा देऊन सर्व शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. तहसीलदार फसुऊद्दीन शेख व पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर वंचित बहुजन आघाडी उपजिल्हाध्यक्ष अरूण डोंगरे, तालुकाध्यक्ष अनिल जाधव, बाबासाहेब मकासरे, जगन्नाथ बाळाजी गायकवाड, प्रहारचे तालुकाध्यक्ष प्रशांत मधुकर पवार, विक्रम गाढे आदींच्या सह्या आहेत.
राज्यातील सर्व शेतकरी, घरगुती व व्यापारी वर्गाचे लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करावे, जळालेले ट्रान्सफार्मर त्वरित दुरूस्ती करावेत,
शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, थकीत वीजबिलापोटी खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करावा, तसेच सक्तीची वसुली थांबवावी, अन्यथा २५ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता राहुरी मार्केट यार्डसमो रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.