अहमदनगर Live24 टीम, 28 मे 2021 :- शहरातील सावेडी येथील गायकवाड कॉलनीतील पिण्याच्या पाण्याच्या व अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला असता, स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
सदर प्रश्नी चर्चा करुन पाण्याचा व स्वछतेचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे, नगरसेवक मदन आढाव, अशोक बडे, दत्तापाटील सप्रे, निलेश भाकरे, हेमंत कोहळे, जयंत रसाळ, लक्ष्मण कवडे,
अतुल मांजरे, रविंद्र रसाळ, रविंद्र जेवरे आदिंसह स्थानिक नागरिक उपस्थित होते. सावेडी येथील उच्चभ्रू असलेल्या गायकवाड कॉलनीत अनेक दिवसापासून नळाला कमी दाबाने पाणी येते आहे. सध्या पिण्यासाठी देखील पाणी मिळणे कठीण झाले आहे.
वेळेवर महापालिकेचे सर्व कर भरुन देखील नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नागरिकांना संचारबंदीतही पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर पडावे लागत आहे.
नळाद्वारे केवळ दहा ते पंधरा मिनिटेच पाणी येत असल्याने एवढ्या थोड्या पाण्यात नागरिकांचे भागत नाही. वॉलमनकडे तक्रार केली असता, ते महापालिकेशी संपर्क साधण्याचे सांगत आहे. तसेच या परिसरात अस्वच्छतेचा प्रश्न देखील गंभीर बनत चालला आहे.
लवकरच पाऊस सुरु होणार असून, साथीच्या आजारांच्या प्रतिबंधासाठी दक्षता घेण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. गायकवाड कॉलनीत जुनी पाईपलाईन बदलून तीन फुट खड्ड खोदून नवीन पाईपलाइन टाकावी,
तात्पुरत्या स्थितीत नागरिकांना पुरेश्या प्रमाणात पाणी मिळण्यासाठी उपाययोजना कराव्या व परिसरातील स्वच्छता करण्याची मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदनावर स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.