अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- कोरोना काळात विविध कामे करुन शिक्षकांनी कर्तव्य बजावले, अशा परिस्थितीमध्ये अनेक शिक्षकांना जीव देखील गमवावा लागला असताना त्यांचे कार्य व योगदान दुर्लक्षित ठेवल्याचा खेद महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
तर आशा सेविकांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची शासनाने दखल घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करुन शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवून आशा सेविकांना अधिक सुविधा पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर व कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना काळात उत्तमपणे कार्य केल्याबद्दल 70 हजार आशा सैनिकांशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले. याबद्दल शासनाचे स्वागत आहे. आशा सेविकांमुळे राज्यांमध्ये कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आशा सेविका या यशाच्या शिलेदार आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत आणि अतिशय तुटपुंज्या सुविधा उपलब्ध असताना त्या सतत काम करत होत्या. दोन ते तीन किलोमीटर पर्यंत दूर असणार्या वस्तीमध्ये पायी जाऊन त्यांनी सेवा दिली.
त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय व कौतुकास्पद असून, त्यांना अधिक सुविधा मिळण्याची गरज आहे. राज्यभरात मागील वर्षापासून कोरोना काळात मनुष्यबळाची कमतरता असेल त्या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
कोणत्याही विभागांमध्ये मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शिक्षकांना कोणतेही प्रशिक्षण नसताना नियुक्ती करण्यात आली. जिथे कमी तिथे आंम्ही याप्रमाणे शिक्षकांनी योगदान दिले. पोलिस बंदोबस्तासाठी, घरोघरी जाऊन तापमान व ऑक्सिजन पातळी तपासण्याचे काम शिक्षक वर्षभर करत होते.
तसेच कोरोना नियंत्रण कक्षामध्ये, ग्रामीण रुग्णालयात, कोरोना तपासणी केंद्रात, लसीकरण केंद्रावर, रुग्णालयाजवळ मदतनीस एवढेच नव्हे तर आर्थर रोड तुरुंगातील कैदी ज्या ठिकाणी विलगीकरणात ठेवले त्या ठिकाणी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.
25 हजार पेक्षा अधिक शिक्षकांना कामासाठी लावण्यात आले. कोरोना काळात कर्तव्य बजावणार्या तीनशे पेक्षा जास्त शिक्षकांना कोरोनाचे संक्रमण होऊन त्यांचे मृत्यू झाले. मात्र त्यांच्या कार्याची व योगदानाची दखल घेण्यात आलेली नसल्याचे शिक्षक परिषदच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाच्या शिक्षण खात्यात अनुकंपा भरती बंद असल्याने, मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर भरती तातडीने मिळालेली नाही, कोरोना काळात कार्यरत असणार्या शिक्षकांचा कुठेही सन्मान झालेला नाही व त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आलेली नाही, मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांच्या वारसांना अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही, कर्तव्य बजावत असताना
वेळोवेळी विमा कवच व आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही, शिक्षकांची फ्रन्टलाइन वर्कर म्हणून घोषणा झालेली नाही आणि त्यांचे लसीकरण ही झालेले नाही, मे महिन्याची सुट्टी काळात काम करूनही बदली रजा नाही आणि सेवा पुस्तकात नोंद नाही,
कोरोना संसर्गाने रुग्णालयात दाखल झाल्यास किंवा विलगीकरणात रहावे लागल्यास विशेष रजा अद्याप देण्यात आलेली नाही, कोरोना काळात कर्तव्य बजावणार्या शिक्षकांना साध्या आरोग्य किट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नाही, अशा परिस्थितीमध्ये मे-जून महिन्यात काम करत असताना देय असलेला वाहतूक भत्ता सुद्धा कापून घेण्यात
आला आणि अद्याप देण्याबाबत निर्णय झालेला नसल्याचे शिक्षकांचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. कोरोना काळात शासन यंत्रणेकडे पडले ते काम शिक्षक करत होते. शालेय शिक्षण विभागाने त्यांचा कुठेही उल्लेख सुद्धा केलेला नाही.
महसूल विभाग, आरोग्य विभाग, गृह विभाग, ग्रामविकास विभाग या सर्वांसोबत कोरोना काळात शिक्षक काम करत होते. शासनाकडून शिक्षकांची उपेक्षा होऊ नये, अशी भावना राज्यभरातील शिक्षकांची आहे. राज्यात आरोग्य खात्याला जे यश मिळाले, त्या मध्ये शिक्षकांचाही वाटा आहे. कोरोनाच्या कामासाठी नियुक्त असलेल्या व उत्तम काम केलेल्या शिक्षकांच्या यथोचित सन्मान करण्याची मागणी शिक्षक परिषदने केली आहे.